हरिहरगडाचा रोमांचकारी आणि सुखद अनुभव घेवून आम्ही अंजनेरीकड चाललो होतो, वाटेतली छोटी गावं जीवन जगण्याची कला सांगून जातात, सह्याद्रीच्या कुशीत लपलेली ही गाव म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच !!
सह्याद्रीच्या कुशीतले हर एक गाव म्हणजे एक विषय आहे, काहीना-काही नवीन पहायला भेटतेच. असच काही वेगळ बघायला मिळाले, एका गावात रस्त्याच्या डाव्या हाथाला उंच डोंगरावरती एका शेतकऱ्याने शेत नांगरून ठेवले होते, एवढ्या उंचीवर आणि उताराला जमीन नांगरून त्यात धान्य पिकवायच, साधी गोष्ट नाही. कारण सांगावी ती फ़क़्त शहरातल्या लोकांनीच, गावाकडची लोक राव कसलेही कारण न सांगता जीवन जगण्याची कला शिकवून जातात.
इथून मग मध्ये कुठेही न थांबता अंजनेरीला जायचे ठरले, पण वातावरण एकदम थंड होते आणि चहा पिण्याची तलप सगळ्यांनाच झाली होती म्हणून एका छोट्या हॉटेलमध्ये चहासाठी थांबलो, तिथे पुन्हा एकदा नेमके कुठून उजवीकडे वळण आहे याची खात्री करून घेतली आणि पुढे निघालो.
थोड्याच अंतरावर बोर्ड दिसला “अंजनेरी कडे” म्हणून … तरीही एकदा विचारले आणि मग गाडी वळवली. कच्चा रस्ता होता, पण ७ सीटरला अश्याच रस्त्याची सवय ! … गाव ओलांडून पुढे गेलो तर बऱ्याच गाड्या तिथे दिसल्या, कदाचित इथेच गाडी लावावी लागेल असे वाटले पण रस्ता तर दिसत होता …
आणि आमचा नेहमीचा एक नियम “जिथे पर्यंत जाते तिथे पर्यंत गाडी घेवून जाणे” रस्ता कसाही असो !!
रस्त्यावर लोक चालत जात होते आणि त्याच्या चेहऱ्यावर त्यांनी केलेला मूर्खपणा सरळ दिसत होता …. रस्ता बेताचाच पण गाडी जावू शकते असा होता …. ३-४ किलोमीटर गेल्यावर गडाच्या पायथ्याला गेलो, जिथून खड्या पायऱ्या सुरु होतात … एका झाडाखाली गाडी लावली … एक छोटीशी टपरी होती तिथे मस्त “कांदाभजी” खाल्ले, तिथेच एक मुलगा होता त्याचे नाव “ज्ञानेश्वर” … म्हणला मी गाईड म्हणून येवू का ? पूर्ण किल्ला दाखवतो ३ गुहा आहेत …. आजूबाजूचीपण माहिती देतो …. ५० रुपये द्या ….. पोरगा लयच भारी होता हो … आणि लयच गोड बोलत होता …. हेर म्हणले चल !!
पायऱ्या एकदम टेरिफिक होत्या, पायऱ्या चढत असताना आजूबाजूचा घोळका पाहताना असे वाटत होते जसे हा किल्ला म्हणजे नाशिक भागातला “सिह्गड”.
किल्ल्यावर चढत असताना वाटेतच पायऱ्यांच्या डाव्याबाजुला एक गुहा किवा लेणी म्हणा ती दिसतात दोन खोल्यांची गुहा आहे आणि या गुहीत अतिशय सुरेख अश्या मुर्त्या कोरल्या आहेत पाहता क्षणी हि गुहा जैनधर्मीय असल्याचे दिसून येते.
भाऊ, हा किल्ला म्हणजे ली दांडगा बर का … आमाला वाटल होत, हा पाहून पुढे रामशेजला जायचं पण जश्या पायऱ्या चढून वर गेलो आणि पठार पहिले आणि पुढे २ टप्प्यात किल्ला आहे आणि शेवटी जंगल सुरु होते, मग म्हणल आता काय रामशेज होणे शक्य नाही, या किल्ल्याचा कानाकोपरा बघायचा आणि मगच खाली उतरायचे.
पठार एकदम दर्जेदार आहे, किल्ल्यावर पहायला काही नाही असे म्हणार्यांची खरच दया आली मला हे पठार पाहून. महादरवाजा नाही, तटबंदी नाही म्हणजे गडावर काही नाही असे मत लोकांचे असावा कदाचित.
पठारावरून पुढे गेल्यावर १०-१५ मिनिटातच अंजनीमातेचा मंदिर लागते, सुंदर आणि प्रशस्त मंदिर आहे, गडावर मुक्काम करायचा असेल तर हे मंदिर उत्तम. इथेपण बाजूला चहा, सरबत अश्या गोष्टींसाठी एक टपरी आहे. आम्ही सगळ्यांनी २-२ ग्लास सरबत पिले त्यात आमच्या गाईडने सगळी ग्लास सांडले आणि विशल्या म्हणला आता हे मार खाताय ….
इथे जरा पावसाने भीती दाखवायला सुरवात केली होती, बारीक झीरमाट सुरु झाले होते पावसाचे वातावरण तसे होतेच पण सुरवात नव्हती झाली, आणि आजून बराच किल्ला पहायचा राहिला होता विशेष म्हणजे “हनुमानाचा जन्म झाला ती जागा”, “सीतेची गुहा” आणि “अंजनी मातेची गुहा”, पठार मोठे आहे आणि भरपूर चालणे आणि लागणारा वेळ.
बिगीबिगी आम्ही हनुमानाचा जन्म झाला ती जागा पाहण्यासाठी निघालो, भरपूर पायऱ्या चढून जायचे होते आणि जोराचा पाऊस सुरु झाला होता, मस्त भिजत गपा हाणत चालत होतो आमचा ज्ञानेश्वर गडाची माहिती देत चालला होता आणि नवीन नवीन मराठी शब्द शिकवत होता …. जसे …
टचका …. गागाट …. एकाएकी … गठन …. याचे अर्थ काय ?
मला फोन करा सांगेन 
पावसात पायऱ्या चढत होतो म्हणून लवकर गेलो … अतिशय सुंदर असे वातावरण होते, धुकॆ आणि पाऊस आणि थंड वारा … फोटो काढायचे होते पण कॅमेरा जवळ नव्हता, पाऊसामुळे कॅमेरा घेतला नव्हता, मोबाईल नेच फोटो काढण्याचे ठरवले होते. हनुमानाचा जन्म झाला त्या जागेवर सुंदर मंदिर बांधले आहे.
दर्शन झाले …. “देवाचिया दरी बसा क्षणभरी” … थोडावेळ बसलो …. गप्पा-गोष्टी … किल्ल्याच्या भव्यतेवर गप्पा …. त्यात आम्हाला आमचा गाईड ज्ञानेश्वर लय डेंजर माहिती द्यायचा … आणि त्याची भाषा फ़क़्त हेरांनाच कळायची आणि हेर आमाला सांगायचे …. पण लय भारी पोरगा होता …. अगदी इमानदारीत त्यानी आम्हाला सगळा किल्ला फिरवला.
दर्शन करून थोडेबहुत फोटो काढून आम्हाला सीतेची गुहा आणि अंजनेरी मातेची गुहा पहायची होती … जाताना गडाच्या पूर्वेला मस्त कडा आहे ती पहायला गेलो, मजबूत वार आणि ढग आणि त्यात हलके उन पडले होते, सह्याद्रीचे बेलाग रूप जे आपण म्हणतो ते रूप सह्याद्रीचे दिसत होते, जोराच्या वार्यामुळे ढग पळत होते आणि त्यातून सूर्याचे किरण .. व्हा …. काय देखावा होता ….
सह्याद्रीच्या वेगवेगळ्या रूपांचे दर्शन म्हणजे काय म्हणावे …. जिथे जाईल तिथे वेगळे रूप आणि सौंदर्य .. हाथ धरून थाबवून ठेवणारा हा सह्याद्री आहे …
पुढचा विषय म्हणजे अंजनी मातेची गुहा … चर्चेत समजले होते की जबरदस्त गुहा आहे, म्हणून पाहण्यासाठी सगळे आतुर होतो … पायऱ्या उतरून खाली जाताना मध्येच उजवीकडे एक पायवाट जाते तिथून गुहेकडे जाता येते …. खाली उतरताना तलावाचा अतिशय सुंदर देखावा दिसत होता, पण धुक्यामुळे जरा अधून मधून फिक्कट दिसायचा ….
या तलावाचा आकार मनुष्याच्या तळपायासारखा आहे, हनुमान या गडावर आलेला त्यावेळी त्याच्या पायाचा जो ठसा उमठ्ला तो म्हणजे हा तलाव असे म्हणतात, यात किती तथ्य आहे माहित नाही पण तलाव मात्र एकदम मनुष्याच्या तळपायाच्या आकाराचा आहे.
डोंगराच्या बाजून एक पायवाट, थोडे अंतर चालले की उजव्या हाताला गुहा लागते, मोठी आणि सुंदर गुहा आहे, गुहेत अंजनी मातेची सुंदर मूर्ती दिसते, उंचीला फारच कमी असलेली ही गुहा, तुम्हाला गुढग्यावर रांगतच जावे लागते.
आतमध्ये जावून आम्ही सगळे अंजनीमातेचे दर्शन घेवून आलो, गुहेच्या तोंडावर बसून आम्ही केंजळगडाच्या गप्पा मारत होतो, गुहेवरून मग कोणत्या गडावर कोणती आणि कशी गुहा आहे यावरून आम्ही केंजळगडावर पोहचलो होतो. आमचा गाईड लय जबरी माहिती द्यायचा जी फ़क़्त आमच्या हेरांनाच कळत होती.
बारीक पावसाने पुन्हा सुरवात केली होती, आणि गडावरचा आता शेवटचा भाग राहिला होता, तो म्हणजे सीतामातेची गुहा. १४ वर्षे वनवासात असताना सीतामाता इथे वास्तव्याला होत्या असे म्हणले जाते, असे असेल तर या गडाचा इतिहास किती जुना आहे हे लक्ष्यात येते.
दाट झाडी आणि बारीक पाउस, यातून गुहेकडे जाणारी वाट, आमचे हेर अगदी Undertaker सारखे दिसत होते आणि पुढे एकटेच पळत होते ….
थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजूला सितामाताची गुहा दिसत होती, झाडीतून हलक्या पावसात ती गुहा लांबून फारच सुंदर दिसत होती.
गुहेला आत जाण्यासाठी एक छोटा दरवाजा आहे, सध्या तिथे लोखंडी जाळीचे दार बसवले आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूला सुंदर मूर्तींचे कोरीव काम आहे.
गुहा दोन भागामध्ये आहे, आता जाताच एक मोठी खोली आहे ज्यामध्ये बर्याच मूर्तींचे कोरीव काम आहे, आणि एक अतिशय छोटा दरवाजा आहे ज्यातून आत गेले की मुख्य गुहा आहे.
आर्धा तास तिथे आम्ही होतो, आजूबाजूचा परिसर आणि ती गुहा म्हणजे खरच एक अभ्यासाचा विषय आहे. कोरीव काम हे अगदी थक्क करण्यासारखेच आहे. अश्या या अतिशय प्राचीन गुहा पाहून या गडाचे ऐतिहासिक महत्व काय आहे हे नक्कीच लक्ष्यात येते.
आता वेळ गडाचा राम-राम घायचा होता, तिथून बाहेर पडून आम्ही गड उतरायला सुरवात केली, भरपूर मोठा किल्ला आहेच त्यामुळे एक ते दीड तास तर लागणारच होता. अंदाजे तासाभारात आम्ही गडाच्या खाली आलो, बर्यापैकी भिजलो होतो आता कपडे बदलून परतीचा प्रवास सुरु करायचा होता.
अडचण एक होती की तिथे कपडे बदलायला जागाच नव्हती, पुढेच एक जागा दिसली वरती परता लावला होता कदाचित पर्यटकाना बसण्यासाठी बनवले असावे, मी आपली गाडी सरळ आता घेतली आर्धी गाडी शेड खाली गेली, मग आवरा-आवर सुरु झाली …..
पुढचा परिसर पाहून आमचे जगतगुरू मोहित झाले, आणि त्यांना “सवरियाचा ….” सीन आठवला आणि लगेच टावेल घेवून उभे राहिले आणि फोटो काढा म्हणले ….
कपडे बदलून, थोडी गाडी साफ करून, प्याकिंग केले आणि स्टारटर मारला …. मुख्य रस्त्याला लागलो … नासिक १७ किलोमीटर होते … आमच्या हेर साहेबांनी नाशिक मध्ये असलेले आपले मित्र आणि ट्रेकर प्रशांत परदेशी यांना फोन लावला, त्यांची भेट घायची होती.
एका हॉटेल मध्ये त्यांची भेट झाली, सर्वांची पहिलीच भेट होती, बर्याच गोष्टींवर गप्पा झाल्या, चहा-पाणी झाला … आणि तासाभराच्या भेटीनंतर आम्ही पुण्यासाठी निघालो ….
आता जेवणाचा बेत होता पण एकही “शुद्ध मांसाहारी” खानावळ दिसत नव्हती …. शोधत शोधत आम्ही चंदनापुरी भागात पोहचलो … तिथे एक उजव्या बाजूला हॉटेल दिसले पण आमची गाडी जरा पुढे गेली होती … म्हणल आता भूक पण लागली आहे आणि १० वाजून गेलेत पुढे कुठे मिळेल माहित नाही म्हणून पुन्हा गाडी मागे घ्वून हॉटेल पुढे गाडी लावली …
त्याच दरम्यान हेरांच्या लक्ष्यात आले की २-३ दिवसापूर्वीच कोणीतरी याच हॉटेल समंधी पोस्ट टाकली होती की इथे एकदा शेवभाजी नक्की खावून बघा …. आम्ही शेवभाजी आणि अंडाकरी मागवली, चिकन आणि मटन संपले होते त्यामुळे अंडाकरीवर समाधान मानले.
आणि खरच अतिशय सुंदर आणि टेस्टी जेवण हो …. या रस्त्यावर प्रवास करताना इथेच जेवणासाठी थांबा … अतिशय चवदार आणि कमी खर्चात जेवण मिळते ….
तरं मित्रांनो …
असा हा आमचा हरिहरगड आणि अंजनेरीचा प्रवास … मला आशा आहे की तुम्हाला आवडला असेल ….












































नमस्कार प्रशांतराव लवटे पाटील साहेब..
आपले संकेत स्थळ खूप आवडले. आपण ज्या स्पिरीट ने आणि तल्लीनतेने इतिहासाचे संशोधन करत आहात ते अतिशय कौतुकास्पद आहे. आज शिवप्रेमी तर खूप पाहायला मिळत आहेत पण किती लोकांच्या छ. शिवाजी जीवापासून आहेत ते त्यांच्या आत्म्यासच माहित!!!
आजकाल इतिहासावरून वाद घालण्याचे जे प्रकार होत आहेत त्यापेक्षा आपण इतिहास स्वताहून अनुभवत आहात हि गोष्ट मला सर्वात जास्त भावली. मी फेसबुक च्या माध्यमातून आपनास गेल्या २-३ वर्षापासून अनुभवत आहे. जेवढे शिवप्रेमी आज पर्येंत पहिले अनुभवले त्यामधील सर्वात हटके आणि मनापासून शिवविचार चालवणारे फक्त तुम्हीच.
सर्वात मह्र्वाचे म्हणजे वातानुकुलीत खोलीत बसून इतिहास लिहणारे खूप जन आहेत पण प्रत्यक्षात तुम्ही मैदानात येऊन अभ्यास करून आपले विचार आम्हाला देता ते हि कोणत्याही स्वार्थाशिवाय हीच खरी शिवपूजा आहे.
राजगड, सिह्गड, प्रतापगड, आणि इतर जे सर्वपरिचित असणारे किल्ले सार्वजन फिरता पण आपण बानुरगड सारख्या ठिकाणी भेट देऊन जाता हि गोष्ट नक्कीच भावणारी आहे.
आपण करत असलेल्या या कार्यास माझ्या मनापासून शुभेच्छा. आपण हाक द्या आपल्यासाठी सदैव हजार असेन.
आपलाच मित्र
रणजीत विष्णुपंत पाटील
आटपाडी
सांगली जिल्हा