भटकंती तशी अनेक वर्षे केली कधी प्रवासी म्हणून तर कधी ट्रेकर म्हणून. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, राजस्थान अशा विविध प्रदेशात फिरलो. किल्ले, पर्यटक स्थळे जे काही असेल ते पहायचे. अनेक दिवसापासून मध्यप्रदेश फिरण्याची इच्छा होती. मुख्य म्हणजे इंदोर, महेश्वर, मांडू, ग्वाल्हेर अशी काही ठिकाणं. शेवटी २६, २७ आणि २८ जानेवारी सलग तीन दिवसाची सुट्टी आली आणि म्हणलं जेवढं होईल तेवढं तर नक्की फिरून यायचं. २०१८ मध्ये किमान ३ राज्ये बायकोला स्वतःच्या गाडीतून फिरवायचे असे ठरवले आहे ज्याची सुरवात मध्यप्रदेशापासून झाली.
सुरवातीला मी, शिऱ्या, शिवबा, दीक्षा आणि मनीषा असे नियोजन होते. पण दीक्षाला एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले होते त्यामुळे तिला काढता पाय घ्यावा लागला. मी आणि शिऱ्या गुगल काकूंच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करत होतो आणि नेमकं आपण ३ दिवसात काय-काय पहायचं हे ठरवत होतो. आम्ही आमचा एक प्लॅन बनवला आणि आमच्या भूषणदादांना सांगितला. दादा हे सगळं फिरून आला होता आणि तो योग्य मार्ग सांगेल हे माहित होते. दादाने मग २-३ प्लॅन्स सांगितले आणि मग शेवटी,
पुणे- इंदोर-मांडू-म्हेश्ववर-ओंकारेश्ववर-रावरखेडी अशी मुख्य ठिकाणं गृहीत धरून प्लॅन केला.
शिऱ्या बिचारा २५ तारखेला पहाटे ५ वाजता लातुरातून निघाला आणि दुपारी पोहचला. मी सुद्धा ऑफिसमधून ३ वाजता बाहेर पडलो आणि ४ ला घर सोडायचे असे ठरले. ऑफिसमधून आलो, बुलेट लावली आणि बघतोय तर काय …. नवीन डिझायर वर मस्त पैकी स्क्रॅच दिसला. लहान मुलं पार्किंगमध्ये खेळताना हा प्रकार घडला होता. लहान मुलं खेळणार, असं काहीतरी होणार, शेवटी लहान मुलं काय कळत त्यांना … हे सगळं ठीक आहे, पण नवीन गाडीवर असा स्क्रॅच पडला की
“दिल तो जलेगा ना” …
झालं … मूडच खराब झाला… काय म्हणलं आता … जाऊ दे … शेवटी या सगळ्या भानगडीत ५ वाजले निघायला. आता सरळ इंदोरला पोहचायचे होते. रस्ता एकदम गुळगुळीत म्हणजे अगदी ..
“खाली पप्प्या लेणे जैसा रोडा”….
शिऱ्या बरोबरअसला की, कुठेही आणि कधीही कुणाला रस्ता विचारावा लागत नाही. गुगलमॅप द्वारे तो अगदी अचूक मार्ग शोधतो. आपल्याला कुठे शॉर्टकट लागेल, कुठे टोल चुकवता येईल, वाटेत जाता-जाता काही पाहण्यासारखी ठिकाणं आहेत का याची संपूर्ण जबाबदारी अगदी अचूकपणे पार पाडतो. त्यामुळे तो असला की कुठे आणि कस जायचं याची काहीच काळजी नसते.
भोसरी गावातून निघालो तर मानसिक त्रास देण्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाणं म्हणजे “चाकण”. चाकणचे ट्राफिक असे होते जसे चाकण चिडवून म्हणत होते …”आता कस होतंय”…. जाशील का सनकत ??…. काय ते ट्राफिक राव … मस्तपैकी एक तास आमचे पाय बांधून ठेवले. पुन्हा राजगुरूनगर होतेच … आता चाकणने एवढा त्रास दिलाय तर राजगुरूनगरचा इगोचा प्रश्न झाला … जरा तर त्रास द्यायलाच पाहिजे ना… मग त्यांनी पण २० मिनिटे अडकवला. आम्ही सुरवातीला संगमनेर – येवला – मनमाड मार्गे मालेगावला जाणार होतो पण आमच्या सोसायटीमध्ये राहणारे तृप्तिल पाटील काही दिवसापूर्वीच इंदोरला जाऊन आले होते म्हणून त्यांना सहज आपलं फोन केला तर ते म्हणाले तिकडून नका जाऊ एकेरी रस्ता आहे आणि वेळ लागेल. मग आम्ही नाशिकमार्गे जायचं ठरवलं. मस्त गप्पा मारत आमचा प्रवास चालू होता. एकदम मस्त गाडी … गुळगुळीत रस्ता …. मस्त अंतर कापत होतो …
*****
आमचं पोरग “शिवबा” याचा एक पर्सनल प्रॉब्लेम आहे. तो म्हणजे, कुठे प्रवासाला निघाले की गड्याला सारखी भूक लागते. घरातून दणकून खाऊन निघालं होत तरीपण …”पप्पा … मला भूक लागली, कुठेतरी चांगले हॉटेल बघून गाडी थांबवा” … झालं आता नाही थांबवली तरी बोंब आणि थांबवली तरी बोंब. मग एका ठिकाणी थांबवली गाडी. मस्तपैकी वडापाव खाल्ला. शिऱ्याला खोकल्याने बेजार केले होते, त्यामुळे गडी काय खात नव्हता. घरातून खोकल्याचं औषध घेतले होते, अधून मधून स्मॉल-स्मॉल मारत होता तो.
निवांत गप्पा मारत मारत आमचा प्रवास सुरु होता. नाशिकच्या आधीच, नाशिकरोड मधून मुंबई-आग्रा हायवेला निघालो.शिऱ्याला हा रस्ता आगोदर माहीत होता तरीही गुगलमॅप सुरूच होता म्हणून आम्ही लगेचच हायवेला लागलो. सुंदर रस्ता आहे त्यामुळे काही अडचण येत नाही. ९च्या सुमारास आम्ही पिंपळगावच्या टोलजवळ पोहचलो. शिवबा गडी पेंगत होता त्यामुळे त्याला जेवायला घालणे गरजेचे होते. आमच्या बाईसाहेबांनी घरातून मस्त डाळ-कांद्याची भाजी, कोल्हापुरी ठेचा आणि चपात्या आणल्या होत्या. टोलच्या जस्ट आधी डाव्या बाजूला एक मस्त हॉटेल आहे. हॉटेलवाल्याने आगोदरच बोर्ड लावून ठेवला होता ….. “बाहेरील पदार्थ खाण्यास मनाई आहे” …
शिर्याला म्हणलं त्याला विचार बाबा आगोदर की घरच जेवण खाल्लं तर चालेल का, ऑर्डर तर देणारच पण घरचेही खाणार….
शिऱ्याने त्याला विचारले … शिऱ्याचा क्युट चेहरा पाहून त्याने लगेच उत्तर दिले “काही हरकत नाही साहेब .. बिनधास्त खावा”… बघा क्युट चेहरा असला की त्याचा फायदा जाईल तिथे होतो.
आता मला आणि शिऱ्याला भूक तर लागली होती पण जास्त खाणं शक्य नव्हते कारण मला पुढे ४०० किलोमीटर गाडी चालवायची होती आणि शिऱ्याला माझ्यावर लक्ष ठेवायचे होते, आणि जर दाबून जेवलो की मग झालं अर्ध्या तासात आम्ही पेंगायला सुरु करणार … बसलो सगळे जेवायला … बाईसाहेबांनी घरचा डबा उघडला … मस्तपैकी खिचडी मागवली … खरं सांगतो एक नंबर खिचडी केली होती त्याने … डाळीला जो तडका दिला होता ना काय सांगू… त्याची टेस्ट अशी होती जशी आपल्याला गावाकडे डाळीच्या आमटीला असते. एक नंबर….. इच्छा होती अजून एक मागवावी आणि दाबून खावी पण झोपेचं लफडं होत त्यामुळे स्वतःला आवरले आणि … दोन चपात्या आणि जरा खिचडी खाल्ली. जेवण झाले मग दोन कप चहा मागवला, त्योबी एकदम भारी होता … चहा मारला आणि मग गाडीचं बटण दाबलं. (ते बटन स्टार्ट हाय नव्ह …).
आता कस असत बघा …. रस्ता एकदम गुळगुळीत … एकदम राईटमध्ये गाडी स्पीड धरत होती … आस स्पीड धरलं तोवर स्पीडब्रेकर हायच … बर, राष्ट्रीय महामार्ग हाय राव .. जरा तर इज्जत ठेवा की त्याची … दोन-चार किलोमीटर गेला की हेंच लफडं … आणि ते ही कसले स्पीडब्रेकर … ते नसत्यात का बारीक-बारीक एकदम ८-१० असत्यात बघा … तसले… बर बारके तर असावेत … एकदम टोलेजंग … म्हणजे झक मारत तुम्हाला १२० ने चालली गाडी २० ला आणून ठेवायला लागणार … जिथं १०० किलोमीटर जायला दीड तास लागतो तिथे हे असल्या लफड्यांमुळे अडीच-तीन तास लागतो. आणि डोक्याची आई-बहीण होते ती वेगळी … आणि सगळे स्पीडब्रेकर दिसत्यात आस बी नाय, एकदम कळतंय की स्पीडब्रेकर हाय … पण वेळ गेलेली असते … आजिबात स्पीड कमी व्हतं नसत … त्यामुळे अधून मधून गाडीची (गाडीची लिहिले आहे, नीट वाचा) आणि तुमची चांगली मसाज होते … झोपलेले सगळे जागे होतात. आणि मागणं बायकोचा आवाज …”जरा हळू चालवा की गाडी”….
*****
आता पुढे मोठे शहर म्हणजे धुळे, मग वाटेत चांदवड, मालेगाव अशी शहरे लागतात. मालेगाव सोडले की मग धुळे लागते. मालेगाव सोडले की धुळ्यापर्यंत झोडगे – आर्वी – लालिंग अशी खतरनाक नावं असलेली गावं लागतात. स्पीडब्रेकरांच्या त्रासांना अगदी इज्जतीत तोंड देत आम्ही इंदोरकडे जात होतो. अधून-मधून झोप आली असे वाटले की मग गाडी कुठंतरी साईडला लावून एक डुलकी मारायची आणि मग पुन्हा प्रवास सुरु व्हायचा … धुळे आले…. सरळ गेला की बायपास होता जो शहराला येडा मारून जातो, जे अंतर जास्त होते, आणि शहरातून गेला की मग ७-८ किलोमीटर अंतर आणि वेळ वाचतो… आणि जवळ-जवळ रात्रीचे बारा वाजले होते मग काय ट्राफिक नसणार म्हणून आम्ही शहरात गाडी घातली. पान खायची लै इच्छा झाली होती पण आता एवढ्या रात्री कुठे मिळणार पान ? पण शहरात एक पानपट्टी उघडी दिसली जी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला होती, यु टूर्न मारून गेलो आणि म्हणलं दादा, पान मिळेल का …भाऊ म्हणले ….
“भाई, सिर्फ गुटका और मावा मिलेगा” …. आर म्हणलं काय तू …. कुठं मिळेल ते तर सांग … भाऊ म्हणले .. “आगेसे राईट मारो, छोटी गली हे, सिधा जावो, पानपट्टी मिल जायेगी” …
आता ती गल्ली लैच छोटी हो … गेलो आपलं वाट काढत … पुढे गेलो तर नुसता बाजारच भरला होता …. मस्तपैकी अंडा-भुर्जीच्या गाड्या होत्या आणि एक पानपट्टी कोपऱ्यावर होती … शिऱ्या म्हणला … “पाटील, तुमी गाडी वळवून घ्या, मी पान घेऊन येतो” … आता शिऱ्याला जाईल तिथे एक उच्च शिक्षित, बुध्दीवान मिळतोच ….
पान बनत असताना एक भाऊ आले …आता यांच्यात झालेले संभाषण बघा …
भाऊ : किधर जाणा ….
शिऱ्या : इंदोर जाणा …
भाऊ : दोसो पचास किलोमीटर होणार, पांच घंटा लगता देखो और तो भी …. में बहुत बार जाता बस से … एक घंटा मे साठ किलोमीटर जाता … इधर-उधर का पकडॆ तो पांच घंटा जाता …
शिऱ्या: हमारे पास वो ( आमच्या गाडीकडे बोट करत ) गाडी हे … तो थोडा जल्दी जायेंगे ना …
भाऊ: और तुम कैसे भी जावो… पांच घंटासे एक मिनिट कम नहीं होणा…
आता नेमकं कोणतं लॉजिक त्यो लावत होता देव जाणे पण शिऱ्याला काय त्याच लॉजिक समजना …. मग जरा कॉमेडी करून आम्ही पान घेऊन तिथून निघालो … पुढे गेलो तर एक चौक लागला जिथे तुकोबांची मस्त मूर्ती होती… भारी दिसत होता चौक ….
धुळेगावचे दर्शन घेऊन मग आम्ही पुन्हा मुंबई-आग्रा हायवेला लागलो. आता महाराष्ट-मध्यप्रदेशची बॉर्डर होती, एक टोल नाका लागला. जिथे भाऊंनी सरळ लिहिले होते “महाराष्ट्र-मध्यप्रदेश बॉर्डर, धुळे हायवे”.
*****
शिवबा आमचा एक झोप काढून उठला होता आणि पुढे शिऱ्याच्या मांडीवर मोबाईलवर गेम खेळत बसला होता, दोघांची आवडती गेम म्हणजे “शॅडो फाईट”, मस्त खेळत बसले होते आणि इकडे मी स्पीडब्रेकरांबरोबर खेळत बसलो होतो. मध्येच मला एक डुलकी लागली आणि गाडी बाजूला जात होती तोवर शिऱ्याने स्टेरिंग वडलं, शिऱ्या म्हणला मी मोबाईलमध्ये बघत नव्हतो म्हणून ठीक नाहीतर तुम्ही रस्त्याच्या त्या बाजूला गाडी घेऊन गेला असता …. आता म्हणलं शरीराने सिग्नल दिला आहे , कुठेतरी चांगला ढाबा किंवा मोठे हॉटेल बघावे आणि गप झोपावे. इंदोर पासून बराबर १३५ ते १४० किलोमीटर अंतरावर एक प्रवाशी निवास असलेले साधे हॉटेल होते जिथे अनेक गाड्या लागल्या होत्या ट्र्क, कार, बस अशा सगळ्या प्रकारच्या गाड्या होत्या … मग मी घेतली गाडी आतमध्ये …. शिऱ्या म्हणला मला झोप नाही आली तुम्ही मग काढा एक झोप … मनीषा आणि शिवबा मागच्या सीटवर मस्त झोपले आणि मी सीट मागे घेऊन मस्त झोपून गेलो. दोन-अडीचच्या दरम्यान आम्ही तिथे पोचलो होतो आणि झोपलो … शिऱ्या पण चार वाजता गाडीमध्ये येऊन झोपला …. मग मी साडेपाच वाजता उठलो, शिऱ्यालापण उठवले … हॉटेलमध्ये जाऊन सकाळचे पाहुणे सोडून आलो … मनीषा आणि शिवबा झोपलेलेच होते …. पुन्हा मग प्रवास सुरु झाला … सकाळी सकाळी काय थंडी होती भाऊ ….. बाहेर फक्त ६ डिग्री तापमान होते. मस्त झोप झाली होती, फ्रेश झालो होतो … पुन्हा स्पीडब्रेकरांची आई-बहीण काढत गाडी पळवत होतो.
तस तुम्ही धुळे सोडले की,सोनगीर – नरताना – दाभाषी (या गावात आपण तापी नदी ओलांडतो ) मग पुढे दहिवडी – शिरपूर – पळसनेर (बॉर्डरवरील महाराष्ट्राचे शेवटचे गावं) अशी गावे लागतात. पुढे मग ज्यावेळी तुम्ही मध्यप्रदेशात घुसता त्यावेळी मध्यप्रदेशातील पहिले गावं ‘शेंधवा’ लागते. मध्य प्रदेशात घुसला की एकदम कडक थंडी सुरु झाली.
*****
शेंधवा वलांडून आम्ही पुढे गेलो … वाटेत जुलवानिया गावं लागते आणि नंतर लगेच खलघात लागते जिथे आम्ही नर्मदा नदी क्रॉस केली. पुढे गेल्यावर मग चहाची तलप झाली. बाजूलाच एक टपरी होती. उजव्या हाताला एक शाळा होती, २६ जानेवारीमुळे मस्त देशभक्तीची गाणी लागली होती. गाडीतून खाली उतरलो तर असली भयानक थंडी होती … काय सांगू… मी आणि शिऱ्या काकडत होतो. त्याला म्हणलं चहा दे बाबा लवकर तर त्यो बनवत होता …. तोवर शिऱ्या बाजूला एक खटिया होती, तिथे जाऊन झोपला. मस्त थंडी, मोठा हायवे, हायवेवर एक छोटस गाव, त्या गावात एक शाळा आणि तिथे २६ जानेवारीनिम्मित लावलेली देशभक्तीची गाणी … एवढं भारी वाटत होता काय सांगू ! थंडबी निबार वाजत होती …. मग चहा झाला … चहा पिलो तोवर एक माणूस पोहे करत होता, चहाचे पैसे देताना शिऱ्याने थोडे हातात पोहे मागितले … “जस्ट फॉर टेस्ट” … गाडीत बसलो, त्याने ते पोहे खाल्ले … आणि म्हणला “पाटील, पोहे लै भारी हायत”…. मग म्हणलं उतरा खाली पुन्हा … खाऊ पोहे … मग पोहे खाऊन पुन्हा इंदोरकडे गाडी सुसाट सुटली.
आता वेध लागले होते ते इंदोरचे …. ढीगभर प्रवास करून आता अगदी जवळ पोचलो होतो. पुढे माणपूर – भिचोली अशी गावे लागतात. वाटेत एका ठिकाणी फ्रेश होण्यासाठी एका ठिकाणी थांबलो जिथे टॉयलेटची व्यवस्था होती. गाडीतून उतरलो तर पुढे मस्त पाटी वाचली….
“आपका ध्यान किधर हे,
टॉयलेट इधर हे”
*****
आता आम्ही मध्यप्रदेशात होतो. नवीन प्रदेश, नवीन लोकं हा सगळा अनुभव घेणयासाठीच खरं म्हणजे फिरायला मला आवडतं. सकाळी प्रवास सुरु केल्यावर जरा स्पीडब्रेकरांनी आम्हाला आराम दिला. फार कमी स्पीडब्रेकर्स होती. आता यापुढे गेलो तर एक बायपास होता जो महू गावचा होता. राउंड मारून जाण्यापेक्षा महू गावातून जाऊ असे शिऱ्याचे म्हणणे होते. म्हणून मग आम्ही मुंबई-आग्रा हायवे पुन्हा सोडला आणि जमली मार्गे महूला गेलो. महूमध्ये एक किल्ला आहे ज्याचा बांधकाम १८१८ नंतरचे आहे. संपूर्ण किल्ला मिलिट्रीच्या तावडीत आहे त्यामुळे विषय एन्ड. २६ जानेवारी निम्मित संपूर्ण गावात नुसता तिरंगा आणि गाणी होती. लगे-लगे आम्ही गाव क्रॉस करून उमरिया मार्गे पुन्हा हायवेला लागलो. या गावात आम्हाला १० रुपयाचा टोल लागला. आणि बायपास सोडल्यामुळे मोठा टोल वाचला. आता इंदोर फारच जवळ आले होते. पिगदंबर आणि राऊ गाव पास केले की लगेच इंदोर.
माझ्या ओळखीचे एक काका आहेत सिद्धाजी वाघमोडे, यांनी मला जाताना इंदोर मध्ये अंबादास काळे म्हणून एकजण आहेत त्यांना फोन करायला सांगितला होता. आणि इंदोरमध्ये गेले की त्यांच्या घरी जावा अशी सूचना त्यांनी दिली होती. काळे काकांनी आम्हाला पुण्यातून निघाल्यापासून ते इंदोरमध्ये पोहचे पर्यंत अनेकवेळा फोन केले होते आणि इंदोरमध्ये तुम्ही कितीही वाजता पोहचा पण घरीच या, हॉटेलमध्ये जाऊ नका अशी सूचना देत होते. आम्हाला वाटतं होते की रात्री २-३ वाजेपर्यंत आम्ही पोहचेल पण तसे झाले नाही. म्हणून त्यांना मग सकाळी फोन केला आणि आम्हाला बापट चौरहामध्ये यायला सांगितले.जिथे ते आम्हाला घेण्यासाठी येणारं होते….
पुण्यापासून इंदोरला पोहचे पर्यंतचा आमचा प्रवास खालीलप्रमाणे :
पुणे-राजगुरूनगर-मंचर-नारायणगाव-आळेफाटा-संगमनेर-नांदूर शिंगोटे- सिन्नर-नाशिकरोड- पिंपळगाव बसवंत (रात्रीचे जेवण)-चांदवड-मालेगाव (धुळ्यापर्यंत झोडगे, आर्वी, लालिंग अशी गावे लागतात) -धुळे (जाताना गावातून गेलो)-सोनगीर-नरताना-दाभाषी (तापी नदी ओलांडतो)- दहिवडी-शिरपूर-पळसनेर (बॉर्डरवरचे शेवटचे गाव)-शेंधवा (मध्य प्रदेशातील पाहिले गाव)-जुलवानिया-खलघात (नर्मदा ओलांडली)-माणपुर-भिचोली (आग्रा हायवे सोडला आणि जामली मार्गे महूला गेलो मग उमरियाला १० रुपयांचा टोल भरून पुन्हा आग्रा हायवे पकडला)- पिगदम्बर – राऊ – इंदोर.
क्रमश:
हे क्रमश: म्हणजे पण स्पीडब्रेकरसारखच जरा कुठ स्पीड लागली की आलचं,
बर येऊदे सोबत फिरल्यागत वाटतय
परया खुप चांगले लिहिले आहेस.
Nice writing saheb……
लय भारी पाटील साहेब